सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचासंदर्भात महत्वाचा आदेश दिला. या आदेशामध्ये 27 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता Floor Test म्हणजेच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाणे गरजेचे आहे. आमदारांना शपथ देणे तसेच बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया ही हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच होणार आहे. यामुळे हंगामी अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हंगामी अध्यक्ष निवडल्यानंतर त्यांच्याकडे सगळे राजकीय पक्ष त्यांचा व्हीपची माहिती देतील.

परंपरेनुसार सदनाचा सर्वात ज्येष्ठ आमदार हा हंगामी अध्यक्ष बनत असतो. ज्येष्ठतेसाठीचा निकष हा वयानुसार नसून सर्वाधिक वेळा निवडून येणे हा असतो. ही परंपरा असली तरी तो नियम नसल्याने ही परंपरा पायदळी तुडवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा आमदाराला राज्यपाल हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करत असतात. सध्याच्या घडीला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे कालिदास कोळंबकर हे सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार असून ते 8 वेळा निवडून आलेले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील अचानक भाजपसोबत गेलेले अजित पवार, काँग्रेसचे के.सी.पाडवी, भाजपचे बबनराव पाचपुते हे सातवेळा निवडून आले आहेत. भाजपचे हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी कांग्रेसचे छगन भुजबळ हे सहा वेळा निवडून आलेले आहेत. हंगामी अध्यक्षाला पूर्ण वेळ अध्यक्षापेक्षा कमी अधिकार असतात, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जे अधिकार त्यांना मिळतात त्यावरून सत्तास्थापनेचा पेच सुटण्यास मदत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या