अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना फसविणाऱया प्राध्यापकाला बेडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नापास झालेल्या विषयाच्या पुनर्तपासणीत हमखास पास करून देतो अशी बतावणी करीत त्यासाठी पैसे घेऊन तीन विद्यार्थ्यांना फसविणाऱया एका प्राध्यापकासह त्याच्या मित्राला घाटकोपर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

सुशील शेपाळे (26) असे त्या प्राध्यापकाचे नाव आहे. शहापूर येथे राहणारा शेपाळे काही महिन्यांपूर्वी आसनगाव येथील जोंधळेकर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकाचे काम करीत होता. त्यावेळी त्याने द्वितीय वर्षात शिकणाऱया आणि अंतिम परीक्षेत एका विषयामध्ये नापास झालेल्या तिघा विद्यार्थ्यांना त्या पेपरच्या पुनर्तपासणीत पास करून देतो असे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने एकाकडून 42 हजार तर उर्वरित दोघांकडून प्रत्येकी 60 हजार घेतले होते. हे पैसे शेपाळेने त्याचा मित्र आणि सोन्याच्या दुकानात काम करणाऱया राहुल गवंदे याच्या बँक खात्यात जमा करून घेतले होते. शेपाळेच्या सांगण्यानुसार विद्यार्थ्यांनी पैसे दिले, मात्र पुनर्तपासणीच्या निकालातदेखील ते नापासच होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी शेपाळेकडे पैसे मागायला सुरुवात केली, पण शेपाळे पैसे देण्यास नकार देऊ लागल्याने विक्रोळीत राहणाऱया विद्यार्थ्याने घाटकोपर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्यासंबंधी तक्रार अर्ज दिला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश काटकर व पोलीस निरीक्षक विलास दातिर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक मोहन जगदाळे, अंमलदार साळुंखे, राठोड, सराडे, पालांडे या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा तपासात शेपाळे आणि गवंदे यांनी मिळून त्या तिघा विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आधी ठाकुर्ली येथे राहणाऱया राहुलला पकडले. त्यानंतर  सुशील शेपाळेच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर सुशील शेपाळेने जोंधळेकर महाविद्यालयाच्या नोकरीला रामराम ठोकला आणि आपला गाशा गुंडाळून त्याने संगमनेर गाठले. तेथे तो गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानवर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवत होता.