कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी आपला आयसीयू बेड सोडला, प्रा. मसूद यांच्या माणुसकीला मालेगावकरांचा सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रज्ञा सदावर्ते 

कोरोना काळ फार कठीण आहे. या कोरोनाने माणसाला आत्मकेंद्रित केले आहे. प्रत्येक जण फक्त आपलाच विचार करतोय की काय अशी परिस्थिती आहे. परंतु अशा परिस्थितीतही समाजात माणुसकीचे दूत आहेत. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मालेगावचे प्रा. मसूद अख्तर. स्वतः कोरोनाशी झुंज देत असतानाही त्यांनी इतर गंभीर रुग्णांसाठी स्वतःचा आयसीयू बेड सोडला. इतर रुग्णांसाठी ते देवदूत ठरले. त्यांच्या माणुसकीला मालेगावकरांनी सलाम केला आहे.

45 वर्षीय प्रा. मसूद हे मालेगावचे रहिवासी आहेत. जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात उर्दू विभागाचे ते प्रमुख आहेत. तिथेच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना 21 एप्रिल रोजी मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले तेव्हा प्रा. मसूद यांची ऑक्सिजन पातळी 34 होती. सीटी स्पॅनचा स्कोअर 19 होता. फुप्फुसात 76 टक्के न्यूमोनिया होता. प्रकृती गंभीर होती. तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तीन तासांतच त्यांची ऑक्सिजन पातळी 50 वर पोहोचली. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली. सहा दिवस ते आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर होते.

दरम्यान, प्रा. मसूद यांनी अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले यांना स्वतःहून सांगितले, ‘मला जनरल वॉर्डमध्ये हलवा. मी बरा होईन. या बेडची गरज गंभीर रुग्णांना माझ्यापेक्षा जास्त आहे.’ प्रा. मसूद यांच्या विनंतीनंतर त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेऊन त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. जनरल वॉर्डमध्ये चार दिवस राहिल्यानंतर ते बरे झाले. आता त्यांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा अन्सारी ओमेर याने दिली.