मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला आंदोलनाचा अडथळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पंढरपूर

आषाढी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे़. मात्र यंदाच्या वर्षी विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आंदोलनाचा अडथळा पार करून जावे लागणार आहे.

२२ जुलै रोजी फडणवीस सपत्नीक महापूजेसाठी पंढरपूरला येत आहेत़. २३ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा असल्याने पहाटेच त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. मात्र त्यांचा यंदाचा पंढरपूर दौरा खडतर असल्याचे दिसून येत आहे़ .कारण सरकार विरोधात अनेक मु्द्यावरून समाजात रोष असून विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व पोलीस ठाणे आदी ठिकाणी विविध मागण्यांचे निवेदने देऊन आंदोलनांचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू, त्यांच्या मार्गावर आत्मदहन करू, त्यांना पंढरपुरात फिरकू देणार नाही, अशा प्रकारचे इशारे निवेदनातून आंदोलकांनी दिले आहेत़

त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, विश्व वारकरी सेना, संभाजी ब्रिगेड, महर्षी वाल्मिकी कोळी संघटना, शरद क्रीडा प्रतिष्ठान यासह अन्य संघटनांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलीस ठाणे आदी ठिकाणी दिले आहेत़
या निवेदात एफआरपी थकविलेले कारखाने व त्या कारखान्याचे चेअरमन, संचालकांवर फौजदार गुन्हे दाखल करावेत़, ९६५ महामार्ग अंतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य तो मोबदला देण्यात यावा़, राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत असून शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे़ जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांवर त्वरित कारवाई करावी या मागण्यां केल्या आहेत़. शिवाय या मागण्या मान्य न झाल्यास आषाढी एकादशीला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही ठिकाणी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे़.

दरम्यान,महर्षी वाल्मिकी सेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या पाण्यात स्वत:ला गळ्यापर्यंत बुडवून घेत शनिवारी अनोखे आंदोलन केले़ ५० वर्षापासूनचे पूर्वीचे पुरावे असूनही आजही आम्हाला जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीत. कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जात नाही, यामुळे हजारो कोळी जमातीच्या शासकीय नोकरदारांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार असल्याने समाजातील नोकरदार भयभीत आहेत. मात्र एकादशी दिवशी आपण जेव्हा विठ्ठलाची महापूजा करत असाल तेव्हा आम्ही ‘जलसमाधी’ घेऊ, असा इशारा संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनातून दिला आहे.