दूध दरवाढ आंदोलनाचा भडका कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यामध्ये दूधदरवाढीचा भडका कायम असून, गेले सहा दिवस डॉ. अजित नवले यांचे नगर जिह्यातील अकोले येथे आमरण उपोषण सुरू आहे. अद्यापि याच्यावर कोणताही तोडगा निघाला नसून, आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज उपोषणस्थळी उपस्थित राहत पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, दूध आंदोलन तीव्र होत असून, दूध उत्पादक शेतकऱयाने येथील तहसील कार्यालयाच्या आवारात शेकडो गायी बांधत प्रशासनाचा निषेध केला, तर माढा शहरामधील इंदिरा गांधी चौकात शेतकऱयांनी ‘रास्ता रोको’ करीत गायीलाच दुधाने आंघोळ घालत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

दुधाला भाव वाढून मिळावा, या मागणीसाठी डॉ. अजित नवले यांनी सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर पाठिंबा देण्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला. अनासपुरे म्हणाले, अजित नवले यांनी जी भूमिका मांडली आहे, ते अतिशय योग्य आहे. वास्तविक पाहता, काबाडकष्ट करणारा हा शेतकरीवर्ग आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला दर नाही. त्यामुळे दुधाला 28 रुपयांवरून पाच ते सहा रुपये दरवाढ द्यावी, अशी मागणी केलेली आहे. ती मागणी रास्त आहे. जर आपण आज 50 व 60 रुपये लिटर दूध विकत घेतो, मग जो मूळ शेतकरी आहे, त्याला त्याचा फायदा व्हायला नको का? असा सवाल अनासपुरे यांनी व्यक्त करीत शेतकऱयांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. मिलिंद नाईकवाडी, डॉ. मोहन पवार, तुळशीराम कातोरे, महेश सोनवणे, राम एखंडे, शुभम आंबरे, भीमाशंकर मालुंजकर, सुनील लोखंडे, नितीन डुंबरे, नीलेश गवांदे, दीपक पथवे, संदीप शेणकर, राहुल शेटे, किशोर शिंदे, सत्यम भोर, अतुल लोहटे, संतोष भोर, राजेंद्र भोर, माणिक पांडे, नानासाहेब धुमाळ आदी दूध उत्पादक आंदोलनाचे संचालन करीत आहेत.