पुणे – तब्बल 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

बेटिंग गेमद्वारे 30 हजार पॉइंट जिंकून देत त्याबदल्यात 30 लाखांच्या खंडणीसाठी तरूणाचे अपहरण करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने 3 लाख रूपये घेताना रंगेहात पकडले आहे. अमोल रमाकांत एकबोटे (वय 29), आणि सौरभ पांडुरंग माने (वय 25 दोघेही रा. बाणेर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तरूणाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली आहे.

पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणाला लोटस अ‍ॅपद्वारे ऑनलाईन क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कसिनो गेमवर बेटिंग लावण्याचा छंद आहे. त्याची एका मित्राच्या मध्यस्थीतून आरोपींची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला बेटिंगमध्ये जादा पॉइंट कमवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादीने स्वतःचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड आरोपींना दिली. त्यानंतर आरोपी अमोल एकबोटेने ऑनलाईन बेटिंगद्वारे 30 हजार पॉइंट फिर्यादी तरूणाला मिळवून दिले. त्याबदल्यात 30 लाख रूपये देण्याची मागणी आरोपींनी केली. फिर्यादीने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून खेड शिवापूरला नेले.

पुरावा तयार करण्याच्या हेतूने आरोपींनी तरूणाचा मोबाईल हिसकावून घेत दर आठवड्याला 3 ते 4 लाख रूपये देणे आहे, असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज तयार करून स्वतःला पाठवून दिला. त्यानुसार तरूणाने फिर्याद दिल्यानंतर पथकाने सापळा रचून 3 लाखांची खंडणी स्वीकारणाऱ्या दोघांना अटक केले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, संपत औचरे, प्रदीप गाडे, अमोल पिलाणे, चेतन शिरोळकर, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.