
दुचाकीस्वार टोळक्याने पिस्तूलाचा धाक दाखवून गॅरेज मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील साडेआठ हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत. ही घटना 14 नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास लोणी काळभोरमधील नवनाथ मोटार रिपेअरिंग गॅरेजमध्ये घडली.
या प्रकरणी राहुल खेडेकर (38, रा. माळीमळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यालगत माळी मळा परिसरात राहूल यांचे मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. 14 नोव्हेंबरला ते कामगारांसह गॅरेजमध्ये होते. त्यावेळी दोन विनाक्रमांक दुचाकीवरील 7 ते 8 जण त्या ठिकाणी आले. त्यांनी राहुलला कोयता आणि पिस्तूलाचा धाक दाखविला. धमकावून साडेआठ हजारांची रोकड काढून घेतली. गॅरेजमध्ये काम करणार्या कामगारांना मारहाण केली. कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.






















































