
मामाच्या मुलाला घरात आसरा देणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. तरूणाने स्वतःच्या लग्नासाठी जमवलेली रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर मामाच्या मुलाने डल्ला मारला. त्यानंतर ऐवज घेऊन हैद्राबादला पसार होण्याच्या तयारीत असताना खडक पोलिसांनी त्याला लोहियानगर परिसरात बेड्या घातल्या आहेत. ही घटना 8 ऑक्टोबरला लोहियानगर परिसरात घडली होती.
मोहम्मद तमीम कलीमउद्दीन चौधरी (वय – 18) असे अटक केलेल्या भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी आरिफ शेख (वय – 27) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मोहम्मद हा आरिफ यांच्या मामाचा मुलगा असून काही दिवसांपूर्वी तो त्यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. त्याकाळात आरिफने स्वतःच्या लग्नासाठी कष्ट करून पै-पै जमविले होते. त्याशिवाय दागिन्यांची खरेदीही केली होती. दरम्यान, काही दिवस राहिल्यानंतर मोहम्मदने आरिफकडे पैसे आणि दागिने असल्याचे हेरले. त्यानंतर घरात कोणीही नसल्याची संधी साधून 2 लाखांची रोकड आणि 50 हजारांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, खडक पोलिसांनी दोन तपास पथके रवाना केली.
यावेळी आरोपी मोहम्मद हैद्राबादला जाण्याच्या तयारीत असून तो लोहियानगरमध्ये असल्याची माहिती पोलीस अमलदार संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे यांना मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन अडीच लाखांचा ऐवज जप्त केला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, एपीआय राकेश जाधव, उपनिरीक्षक अतुल बनकर, अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, महेश पवार, समीर शेख, नितीन जाधव, मंगेश गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, रफिक नदाफ यांनी केली.






























































