Pune crime news पुण्यात जनरेटर चोरणार्‍या तिघांना अटक, जनरेटरसह रिक्षा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेल्हा तालुक्यातील खरीव गावातून जनरेटर चोरी करणार्‍या तिघांना गुन्हे शाखा यूनिट दोनच्या पथकाने आंबेगाव पठार परिसरातून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून चोरीचे जनरेटर आणि रिक्षा असा एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शैलेश चंद्रकांत निवगुणे (वय २१, रा आंबी. ता हवेली), सागर शिवाजी भोसले (वय – 20, रा. लशिरगांव, वेल्हा), सुमित परशुराम गजले (वय – 21, रा. दापोडे, ता. वेल्हा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान एका रिक्षामध्ये चोरीचे जनरेटर असून ती रिक्षा कात्रजकडून नवले पुलाकडे जात असल्याची माहिती अंमलदार नामदेव रेणूसे, उत्तम तारू यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा आंबेगाव पठारमधील दत्तनगर परिसरात रिक्षा अडवली. रिक्षामध्ये पाहणी करता एक लाल रंगाचा जनरेटर आढळून आला. त्याबाबत आरोपी निवगुणे, भोसले आणि गजले यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संगणमताने 15 दिवसांपूर्वी वेल्ह्यातील खरीव गावातून जनरेटर चोरल्याचे सांगितले.

पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर याबाबत वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेवून जनरेटर आणि रिक्षा जप्त केली. पुढील तपासासाठी आरोपींना वेल्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा यूनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नामदेव रेणुसे ,उत्तम तारू, अमोल सरडे, साधना ताम्हाणे, विजय पवार, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.