
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हडपसर परिसरातील महंमदवाडीतील पब 24 वर पोलिसांनी काल मध्यरात्री कारवाई केली. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 104 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील उपहारगृहे, मद्यालये रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामध्ये नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत शनिवारी मध्यरात्री महंमदवाडीतील पब 24 मध्ये मोठ्या प्रमाणावर युवक-युवतींची गर्दी झाली होती. नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. पबचालक, व्यवस्थापकांसह 104 जणांवर कारवाई करण्यात आली.
































































