
टॅकरमधून ऑईलची चोरी करून भेसळ करणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार टँकर, दोन दुचाकी, असा तब्बल 42 लाखांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. राजू मानसिंग जाधव (वय 35 रा. कात्रज), श्रीकांत श्रीमंत पाटोळे (वय 37, रा. सहकानगर), हुसेन रज्जाक शहाआलम (वय 37, रा. गोवंडी, मुंबई) आणि सुशील कुमार रॉय (वय 42, रा. साकीनाका, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमित जगदीश पांडे (रा. कात्रज) याच्या सांगणेवरून चोरी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कात्रजमधील जुना घाटात दोन टँकर उभे असून दोघेजण त्यातील ऑईल चोरी करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकानगर आणि भारती विद्यापीठ पोलिसांना सूचना करून कारवाईचे आदेश दिले. दोन्ही पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, टँकरमधून ऑईल चोरणाऱ्या आरोपींनी पळ काढण्यास सुरूवात केली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांच्या पथकाने केली.
टँकरमधून ऑइलची चोरी करून त्यामध्ये भेसळ करणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी टोळीला ताब्यात घेउन अटक केली. त्यांच्याकडील चार टँकर आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. – सागर पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन


























































