
‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला आहे, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर जिवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांना अटक केली.
मुस्तफा उर्फ खड्डा शेख (20), राहुल सनी देवरे (19, रा. रामटेकडी), बसवराज मानप्पा मागीर (२१), पंकज विठ्ठल कांबळे (39, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शुभम भंडारी (26) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हडपसरमधील साई सोसायटीजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. फिर्यादी व आरोपींमध्ये जुने वाद आहेत. यातूनच मंगळवारी आरोपी शेख व त्याच्या साथीदारांनी रिक्षातून जाणार्या भंडारी याला अडविले. ‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला आहे. तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून त्याच्यावर जिवघेणा हल्ला केला. भंडारीने येथून पळ काढला, मात्र आरोपींनी त्याच्या रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात हडपसर पोलिसांनी चौघांना तात्काळ अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील करीत आहेत.



























































