बिबटय़ाच्या हल्ल्यात दीड वर्षाची बालिका गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबटय़ाच्या जबडय़ातून दीड वर्षाची बालिका बचावल्याची घटना अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे मंगळवारी सायंकाळी घडली आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या बालिकेवर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माई जनक वैद्य असे या बालिकेचे नाव आहे.

सुगाव खुर्द येथून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील सुखदेव भिकाजी वैद्य यांच्या रस्त्यावरील घरासमोर त्यांची नात सायंकाळच्या सुमारास घराच्या ओटय़ावर खेळत होती. बाजूच्या उसातून अचानक आलेल्या एका बिबटय़ाने या बालिकेवर झडप घालून तिला जबडय़ात पकडले. तिला उचलून घेऊन जात असताना, तिच्या बहिणींनी आरडाओरडा केला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तिचे आजोबा व घरातील लोक बिबटय़ाच्या मागे पळाले. त्यामुळे बिबटय़ाने मुलीला तेथेच टाकून बाजूच्या उसात पळ काढला. घरापासून सुमारे 100 फुटांवर बिबटय़ा या मुलीला घेऊन गेला होता. तिच्या गळ्याभोवती बिबटय़ाच्या दाताच्या गंभीर जखमा झाल्या आहेत.

वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम व त्यांचे सहकारी तातडीने रुग्णालयात आले. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रुग्णालयात येऊन जखमी बालिकेची भेट घेतली. अकोले येथून रात्री उशिराजखमी बालिकेस प्रवरा नगर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.