
पुणे बाजार समितीने गुलटेकडी मार्केट यार्ड फळे, भाजीपाला बाजाराच्या आत खरेदीदार, व्यापाऱ्यांच्या वाहनांकडून सुरू केलेल्या पार्किंग शुल्क वसुलीला बाजार घटकांचा होणारा विरोध लक्षात घेऊन अखेर संबंधित ठेका रद्द केला आहे. यापुढे बाजारात येणाऱ्या खरेदीदार, व्यापाऱ्यांच्या वाहनांकडून नाममात्र दरात वार्षिक शुल्क घेतले जाणार आहे. त्यामुळे बाजारातील आडते, कामगार, खरेदीदार, व्यापारी, टेम्पोचालक आदी सर्व संघटनांनी रविवारपासून पुकारलेला बेमुदत मार्केट यार्ड फळे व भाजीपाला बाजार बंद मागे घेण्यात आला आहे.
फळे भाजीपाला बाजारात येणाऱ्या वाहनांना पार्किंग शुल्क आकारण्याच्या निर्णयाला विरोध करत बाजार घटकांनी बंदचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली बाजारातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत पार्विंâग शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करत नाममात्र दरात वार्षिक शुल्क घेण्याचा निर्णय झाला. बैठकीस फळे व भाजीपाला विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर, मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, राजेंद्र कोरपे, बापू भोसले, राजेंद्र रेणूसे, विशाल केकाणे आदी उपस्थित होते.
याबाबत कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, टेम्पोचालकांकाडून पार्किंग शुल्काऐवजी नाममात्र प्रवेश शुल्क घेण्यास बैठकीत तत्वतः मान्यता दिली आहे. यावर खरेदीदार आणि टेम्पो चालकांच्या गुरूवारी (दि.१८) होणाऱ्या बैठकीत प्रवेशशुल्क रक्कम किती द्यायची हे ठरेल. त्यानंतर तसा प्रस्ताव समितीला देण्यात येईल.
पार्किंगच्या नावाखाली पैसे घेतल्यास कायदेशीर कारवाई
बाजार समितीने ठेकेदारामार्फत घेतले जाणारे पार्किंग शुल्क बंद करण्यात येत असून संबंधित ठेका तात्पुरता स्थगित केला आहे. पुढील काळात हा ठेका रद्द होईल. आता सर्व व्यापारी, खरेदीदार टेम्पोधारकांकडुन नाममात्र दरात वार्षिक वाहनतळ सुविधा शुल्क एकरकमी आकण्याचा निर्णय एकमताने बैठकीत घेतला आहे. यापुढे खरेदीदार टेम्पोचालकांच्या सोयीनुसार बाजार समितीचे कर्मचारी त्यांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध करून देतील. टेम्पो चालकाकडून कोणी पार्किंग शुल्क आकारणी केल्यास त्याच्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
— मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती, पुणे.

























































