पुणे : नाना पेठेतील व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

वाहनांचे सुट्टे भाग विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला धमकावून 12 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याला अटक करण्यात आली. आयनुल अन्वर खान (वय 26) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दुकानातील कामगाराने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नाना पेठ भागात वाहनांचे सुट्टे भाग विक्री करणाऱ्या दुकानात तक्रारदार कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी खान दुकानात आला. त्याने दुकान मालकाला 12 हजार रुपयांची खंडणी मागितली. मालकाने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर दुकानातील कामगाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या हातातील 4 हजारांची रोकड हिसकावून खान पसार झाला. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पसार झालेल्या खानला पकडले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. इ. आळेकर तपास करत आहेत.