
अलंकार पोलीस चौकीत नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अलंकार पोलीस चौकीत ही घटना घडली. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
योगेश लक्ष्मण आढारी (42) असे मृत्यू झालेल्या पोलीस कॉनस्टेबलचे नाव आहे. आढारी हे अलंकार पोलीस चौकीत शुक्रवारी रात्री नाईट डुटीवर होते. पहाटे चारच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते चौकीतच झोपी गेले होते. सकाळी सहकाऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. इतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सकाळी साडेनऊच्या सुमारास चौकीचा दरवाजा तोडून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून आढारी यांची अलंकार पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




























































