मोक्कास्त्राच्या शंभरीत सराईतांच्या टोळ्या भुईसपाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर अशी बिरूदे मिरवणाऱ्या पुण्यात सराईतांनी नागरिकांना वेठीस धरले होते. दिवसाढवळ्या लुटमार, खून, खूनाचा प्रयत्न, मारामारीमुळे ठिकठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शालेय विद्यार्थिंनी, महिला कामगार, स्थानिक नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून टोळक्यांची दादागिरी वाढीस लागली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारताच मोक्का कायद्याचा प्रभावी वापर सुरू केला. कायदा सुव्यवस्था राखण्यासह शहरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी त्यांनी दोन वर्षांत तब्बल 100 टोळ्यांचा सुफडासाफ करीत इतिहास रचला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात राज्यातील कोणत्याही भागात मोक्का कायद्याद्वाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या नव्हत्या. पुणे पोलिसांनी सराईत नामचिन टोळ्यांचा बिमोड करीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले आहे.

आयटी हब, उद्योग व्यापार, गुंठेवारी, परदेशी कंपन्यांची पुण्यातील गुंतवणूक वाढीस लागल्यानंतर गुन्हेगारीचा आलेख वेगाने वाढला. विशेषतः कोरोनानंतर आर्थिंक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काहीजणांकडून चोरीचा माग पत्करण्यात आला. त्यातच सराईत टोळ्यांनी नंगानाच करीत खंडणी मागणे, धमकाविणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खुनी हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण वाढले. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील नागरिकांना गुंडांचा मनस्ताप सहन करावा लागत होता. एकीकडे अनेकांचा रोजगार बुडालेला असताना, दुसरीकडे मात्र, सराईत चोरटे सुसाट होते. लुटमार, मारामारी करीत टोळ्क्यांनी वरचष्मा कायम ठेवला होता. त्यापार्श्वभूमीवर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यापुढे उभे ठाकले होते. एखाद्या गुन्ह्यानंतर सराईताला पोलिसांकडून अटकेचा सरावच झाल्यामुळे ते निर्ढावले होते. त्यापार्श्वभूमीवर सराईतांची कुंडली एकत्रित करीत त्यांचे रेकॉर्ड बनविण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना देण्यात आले होते. त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यांनी हद्दीतील सराईत गुन्हेगार, नामचिन टोळ्या, अवैध धंद्यांची इत्भूंत माहिती गोळा करण्यावर भर दिला. त्याद्वारे पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांचे उदात्तीकरण करीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांविरूद्ध थेट मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यास गती दिली. त्यामुळे सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्का कारवाईने कंबरडे मोडण्यात आले.

तत्कालीन बहुतांश पोलीस आयुक्त, सहआयुक्तांनी सराईत टोळ्यांविरूद्ध ठोस कारवाईची पाउले उचलली नसल्याचे सिद्ध झाले आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्यांना काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभय दिल्यामुळे अल्पावधीतच टोळ्यांची दादागिरी वाढीस लागली होती. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले होते. कधी खूनाचा प्रयत्न, अपहरण, खून, खंडणीचे दिवसाआड गुन्हे घडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रथमतः प्रशासकीय विभाग ठरवून कारवाईचा प्लॅन आखला. गुन्हे शाखेच्या सहा पथकांसह खंडणी विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक, आर्थिंक गुन्हे शाखा, सायबर विभाग, अमली पदार्थ विरोधी पथकांना जबाबदारी विभागून देण्यात आली होती. त्याशिवाय प्रत्येक पोलीस ठाणेप्रमुखांना मोक्का अनुषंगाने डेटा एकत्रित करून वेळेत रिपोर्टिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्यांदाच हडपसर पोलीस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात आरोपींविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली. त्यामुळे सराईत टोळ्यांमध्ये दहशत निर्माण झाली.

दुचाकीस्वार चोरटे, शस्त्राचा वापर करीत लुटमार करणाऱ्यासह दादागिरी व भाईगिरी करीत दहशत माजविणाऱ्या टोळक्यांची पोलिसांनी कुंडली तयार करून त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा धडाका सुरू केला. एकापाठोपाठ एक टोळक्याविरूद्ध मोक्का कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली. झाडाझडती सुरू केल्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी सराईत गुन्हेगारांची पळताभुई झाली. अनेकांनी तर हद्दीतील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सुरूवात केली. साहेब आम्ही पोलीस ठाण्यात हजर होतो, पण मोक्का कारवाई करू नका, इथून पुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नसल्याची हमी दिली. मात्र, गुन्हेगारीमध्ये सामील असल्यास तुमची थेट कारागृहात रवानगी होणार असा मेसेज पोलिसांनी कारवाईतून दिला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन वर्षांत मोक्का कारवाईनुसार सराईत 100 टोळ्यातील तब्बल 670 गुंडांची विविध कारागृहात रवानगी केली. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत होउन शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे.

दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करीत दिवसाढवळ्या दारूविक्री करणाऱ्या टोळीविरूद्ध राज्यात पहिल्यांदाच मोक्का कारवाई करण्यात आली. त्याशिवाय गांजाविक्री करणे आणि लोनअ‍ॅप प्रकरणी नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीविरूद्धही पहिल्यांदाच मोक्का कारवाई करण्यात आली आहे. राजकीय किंवा सलोख्याच्या दबावाला बळी न पडता पुणे पोलिसांनी गुंडांविरूद्ध केलेल्या कारवायांमुळे वाहवा केली जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारल्यामुळे सराईतांनी धास्ती घेतली आहे. कायदा सुव्यस्था राखण्यासाठी सराईतांची प्रत्येक पोलीस ठाण्यात हजेरी घेतली जात आहे. विशेषतः खूनाचा प्रयत्न, मारामारी, लुटमार, दरोड्यातील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय भाईगिरी करणाऱ्यानाही एमपीडीएनुसार तुरूंगात डांबले जात आहे.

मेरे नजरोसे कभी छुटेगा नही

साहेब आम्ही स्वतःहून हजर होतो, पण मोक्का कारवाईचे रेकॉर्ड तयार करू नका. आम्ही इथून पुढे गुन्हा करणार नाही, काहीही करा पण मोक्का कारवाई नको, अशी गयावया गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात केली जात होती. मात्र, एैशी गुंडागर्दी करोगे, तो मेरे नजरोसे कभी छुटोगे नही, असा इशारा देत पोलीस आयुक्तांनी सराईत टोळ्यांचा बिमोड केला आहे.

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील गुंडासह सराईत टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी प्राधान्य दिले होते. त्यानुसार सराईतांची माहिती एकत्रित करण्यापासून त्यांच्याविरूद्ध मोक्का कारवाई होईपर्यंत पोलिस ठाणे स्तरापासून सर्वच सहकाऱ्यानी कष्ट घेतले. त्याद्वारे गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करून शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासह नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यात आले आहे. विशेषतः ‘मोक्का’, ‘एमपीडीए’ नुसार कारवाई केल्यामुळे टोळ्यांचा बिमोड झाला आहे.                                                                                                                        – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर