पुणे पोलिसांना मिळणार समुपदेशनाचा बुस्ट, वाढत्या गैरप्रकारांमुळे प्रशासनाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune-police

>> नवनाथ शिंदे

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा ताणतणाव, मानसिकता, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात समुपदेशन केले जाणार आहे. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमधील हाणामारी, महिला पोलिसाचा विनयभंग, विनामास्क कारवाईदरम्यान पोलिसांकडून नागरिकांशी अरेरावीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वांना समुपदेशनाचा डोस दिला जाणार आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेली हाणामारी ताजी असतानाच महिला कर्मचाऱ्यांमध्येही ‘फ्री स्टाइल’ मारामारी झाली होती. त्यानंतर मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडल्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याशिवाय कोरोना कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र ड्युटी केली आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढल्यामुळे वादावादीचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे प्रशासनाला दिसून आले आहे. विनामास्क कारवाईदरम्यान काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी हुज्जत घालून गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांमधील पोलिसांची प्रतिमा उंचाविण्यासाठी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे समुपदेशन करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

पोलिसांच्या बोलण्याच्या पद्धतीवर अनेकांचा आक्षेप

तक्रार देण्यासाठी किंवा न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा पोलिसांच्या शाब्दिक आघाताला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस ठाण्यात काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः कोरोना कालावधीत विविध कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमधील वादावादीचे रूपांतर गुन्ह्यात झाले आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांच्या जीभेला आवर घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

”शहरातील पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यांचे ताण-तणाव, मानसिकता, कामाच्या पद्धतीचा अभ्यास करून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याशिवाय योगा धडे देण्याचेही विचाराधीन आहे.”– डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन.