
>> नवनाथ शिंदे
गुन्हेगाराला शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच ड्राय पंचनाम्याचा प्रयोग केला आहे. त्यानुसार सोनसाखळीचोर आणि दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींकडून आहे तसाच घटनाक्रम घडवून सीसीटीव्हीमध्ये रेकॉडिंगद्वारे ड्राय पंचनामा यशस्वी केला आहे. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा मिळवून शहर पोलिसांनी मोक्कातील दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये डिजिटल फॉरेन्सिक पुरावे म्हणून ड्राय पंचनामा अहवाल तयार केला आहे.
पोलिसांनी पाषाण परिसरात जेष्ठाची सोनसाखळी हिसकाविणार्या दीपक माळी आणि मुकेश साळुंखे यांना अटक केली होती. चौकशीत ‘दोन्ही संशयितांनी तब्बल 25 सोनसाखळी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांविरूद्ध जूनमध्ये मोक्कानुसार कारवाई केली. त्याशिवाय 11 जूनला मांजरी परिसरात दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेने सोन्या उर्फ हरीश भोसले आणि पुरुषोत्तम राजेंद्र वीर अटक केली. त्यांचा दरोडा आणि इतर गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचे उघडकीस आले. त्याशिवाय दोघांनी धारदार शस्त्राच्या धाकाने एकाचा मोबाईल, रोख रक्कम आणि घड्याळ लुटले होते. याप्रकरणी दोन्ही प्रकरणात मोक्का गुन्ह्यातील सबळ पुरावे पोलिसांना तयार करायचे होते. त्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ड्राय डिजिटल पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.
गुन्ह्यात त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ड्राय डिजिटल पंचनामा अहवाल तयार करण्याचे ठरविले होते. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे मूळ फुटेज हस्तगत केले. त्यानुसार पहिल्या गुन्ह्यात जेष्ठाची सोनसाखळी हिसकाविणार्या दीपक माळी आणि मुकेश साळुंखे यांच्या ‘शहरातील 12 वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये हालचाली नोंदविली गेली होती. त्यानंतर दोघांनाही पुन्हाः पाषाण परिसरात नेले. त्यांना गुन्ह्याच्यावेळी परिधान केलेले कपडे घालायला दिले. त्यानंतर मोटार सायकलवर बसवून सीसीटीव्ही कॅमेर्याखाली दुचाकी चालविण्यास सांगितले. त्यानुसार मूळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणि ड्राय पंचनामा फुटेजमधील संशयित व्यक्ती सारखेच दिसत होते. अशारितीने ड्राय पंचनामा करून प्रयोग यशस्वी करण्यात आला.
शहरातील मांजरी परिसरात दरोड्यात सहभागी असलेल्या दोन्ही संशयितांनी रात्रीच्यावेळी दरोडा टाकला होता. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर सबळ पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले होते. घटनाक्रम उभा करण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण देखावा पुन्हा तयार केला. त्याचप्रमाणे आरोपींना सीसीटीव्ही परिसरात चालण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आरोपींचे मुळ सीसीटीव्ही पुâटेज आणि ड्राय पंचनाम्यातील रेकॉडिंगद्वारे पुरावे गोळा करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेले साहित्य, शस्त्र, दुचाकी याद्वारे हुबेहुब चित्रीकरण करून पोलिसांनी ड्राय पंचनामा यशस्वी केला आहे. विशेषतः गंभीर गुन्ह्यांमध्ये पुरावे गोळा करण्याची ही नवीन पद्धत आहे. राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेने केलेल्या पडताळणीनंतर संशयितांविरूद्ध हे पुरावे तयार केले जातात. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची ओळख आणि ड्राय पंचनाम्या मुळे त्यांना दोषी ठरवले जाणार आहे.
गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यासाठी सबळ पुरावा उपलब्ध व्हावा, याहेतूने घटनेचा ड्राय पंचनामा करून अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सीसीटीव्हीतील मुळ फुटेज आणि ड्राय पंचनाम्याचे विश्लेषणाद्वारे आरोपींना शिक्षा होण्यास मदत होणार आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर


























































