पुणे – वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसाने केली ड्रेनेजची सफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूककोंडीचा अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात येताच कोंढव्यातील वाहतूक कर्मचाऱ्याने ड्रेनेज लाइनमध्ये हात घालून कचरा काढून पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर काहीवेळातच परिसरातील रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत झाली. लुल्लानगर चौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचारी निखिल नागवडे यांच्या कार्याबद्दल नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

शहरात गुरुवारी दिवसभर हलका पाऊस असल्यामुळे लुल्लानगर चौकात पाण्याचे अक्षरश: तळे साचले होते. त्यातच बाप्पांचे आगमन असल्यामुळे वाहतूक मंदावली होती. साचलेल्या पाण्यातून लोकांना मार्गस्थ होता येत नसल्याने चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यावेळी कोंढवा वाहतूक शाखेने पोलिस कर्मचारी निखिल नागवडे यांनी परिस्थितीचा अंदाज घेत ड्रेनेज लाइनमध्ये हात घातून साचलेला कचरा बाजूला काढला. त्यामुळे साचलेले पाणी वेगाने वाहून गेल्यामुळे वाहतूककोंडी सुटण्यास मदतही झाली. साचलेले पाणी ड्रेनेजमध्ये घालविण्यासाठी नागवडे यांची कसरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांनी महानगरपालिकेच्या कामगारांची वाट न पाहता त्यांनी स्वतः पाण्याचा निचरा करण्यास प्राधान्य दिले. पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, कोंढवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एपीआय लेखाजी शिंदे यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.