आरटीओ एजंटच्या नावाने तरुणाला घातला गंडा, मोटार खासगी करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

प्रवाशी गाडीची खासगी वाहतूकीच्या संवर्गात नोंदणी करण्यासाठी आरटीओ एंजटने तरूणाला तब्बल 1 लाख 47 हजारांचा गंडा घातला आहे. आरटीओतील विविध विभागात काम करणाऱ्यांना पैसे दिल्यानंतरच गाडीची नोंदणी प्रायव्हेट होण्याच्या नावाखाली त्याने पैसे लाटले आहेत. याप्रकरणी अझिम मिसार इबुशे (वय 28, रा. कोल्हापूर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशाल अर्जुन सोनवणे (रा. थिटे वस्ती, खराडी ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अझिम मूळचे कोल्हापूरमधील रहिवाशी आहेत. त्यांची मोटार टुरिस्ट असल्यामुळे त्यांनी विशालची भेट घेऊन मोटारीची आरटीओ कार्यालयात खासगी नोंदणीची मागणी केली होती. त्यानुसार विशालने मोटार प्रायव्हेट करण्यासाठी अझिमला 1 लाख 25 हजार आणि वैयक्तिक 5 हजार रूपये असा खर्च सांगितला होता. त्यानुसार मोटारीची प्रायव्हेट नोंदणी करण्यासाठी अझिमने विशालला एनइएफटी करून तब्बल 1 लाख 47 हजार रूपये पाठवून दिले. मात्र, त्यानंतरही विशालने मोटारीची नोंदणी प्रायव्हेट करून दिली नाही. त्यामुळे अझिमने त्याला फोन केला असता, मी तुमची रक्कम खर्च केली आहे. लवकरच तुमचे पैसे परत देईन, मी तुमचे काम करू शकत नाही, असे म्हणून फसवणूक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या