शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याची शिक्षा; अरविंद वाळेकर यांचे पोलीस संरक्षण काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याची शिक्षा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना दिली. वाळेकर यांचे पोलीस संरक्षण आज काढण्यात आले.

कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले  अरविंद वाळेकर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना शहरप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 2011 मध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात वाळेकर सुदैवाने बचावले. तेव्हापासून त्यांना पोलीस संरक्षण आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर वाळेकर यांनी शिवसेना सोडून त्यांच्या गटात जाण्यास स्पष्ट नकार दिला. कोणत्याही दबावाला न जुमानता ते ठामपणे शिवसेनेसोबत उभे राहिले. त्यामुळे सूडाच्या भावनेतूनच त्यांचे पोलीस संरक्षण आज काढण्यात आले. याबाबत वाळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ‘मला यावर काहीही बोलायचे नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.