
सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावत पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी बुधवारी दिल्लीच्या दिशेने कूच केली. आपल्या मागण्यांना घेऊन सरकार विरोधात एकवटलेले सर्व शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहीत एकत्र आले आहेत. मात्र, या दोन्ही सीमांवर पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना रोखून धरले. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली असून आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागले आहे.
आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येने पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणाऱ्या खनौरी सीमेवर जबरदस्तीने ट्रॅक्टरसहीत दाखलं झाले आहेत. बुधवारी काही शेतकऱ्यांनी सीमेवरील बॅरिकेटिंग हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घटनास्थळी तैनात असलेल्या हरियाणा पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चा सांभाळला आणि शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी रबरी बुलेट्सचाही वापर केला. पोलिसांच्या या आक्रमकतेमुळे एका 20 वर्षीय तरूण आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर 25 जण जखमी झाले असून इतर 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
25 जखमी आंदोलकांपैकी 10 शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर शेतकऱ्यांवर शंभू येथील आरोग्य शिबिरात वैद्यकीय उपचार करण्यात आले. तर तीन जखमींवर पतियाळा येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व झटापटीत एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे बंद केले आहे.


























































