पैशांच्या वाटणीवरून भावानेच केला भावाचा खून, राहाता येथील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बकरी विकल्यानंतर आलेल्या पैशांच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये वाद होऊन मोठय़ा भावाने तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून लहान भावाचा खून केल्याची घटना तालुक्यातील शिंगवे येथे घडली आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जालिंदर रमेश मोरे (वय 25) असे मृताचे नाव असून, महेंद्र रमेश मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. चुलतभाऊ राजेंद्र मोरे याने फिर्याद दिली आहे.

बकरीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून जालिंदर आणि महेंद्र यांच्यात 27 जानेवारी रोजी सकाळी वाद झाले होते. त्यानंतर आई-वडिलांशी भांडण करून दोघे दारू पिऊन आले. दुपारी पुन्हा शिंगवे गावातील लक्ष्मीआई मंदिरासमोर त्यांच्यात वाद झाले. यातून महेंद्रने जालिंदरच्या गळ्यावर वार केले, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, हेडकॉन्स्टेबल डी. डी. तुपे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी महेंद्र मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.