राहाता – तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या; दोघांना अटक, एक फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉलेजला येता-जाता त्रास देणाऱ्या तीन तरुणांना कंटाळून 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी लोणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मयूर दिलीप पवार, किरण मच्छीन्द्र गुंजाळ व साहिल कैलास राजळे अशी आरोपींची नावे आहेत.

राहाता तालुक्यातील 17 वर्षीय मुलगी बाभळेश्वर येथे शिक्षणासाठी जात होती. एकेदिवशी ती अचानक गायब झाल्याची तक्रार लोणी पोलिसांना मिळाली. चौकशीदरम्यान निर्मळ पिंपरी येथील शेततळ्यात तिचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. चौकशीदरम्यान तीन तरुण तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली, तर एक जण फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी आरोपींविरोधात भांदवी कलम 305, 354 (डी) 34, तसेच बालकांचे लैगिक अत्याचारापासून संवरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीचे सपोनी युवराज आठरे करत आहेत.