
सामना प्रतिनिधी । मुंबई
विधानसभेतील नेता निवडीसाठी काँग्रेसने आज मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीतील चार तासांच्या चर्चेनंतरही नवीन नेत्याच्या नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नवीन नेता निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह किमान बारा आमदारांनी दांडी मारली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने नवा नेता निवडीसाठी विधानभवनात काँग्रेस आमदारांची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आशीष दुवा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षासाठी नवा नेता निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडला. या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकुर, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे विधिमंडळातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या नावाची घोषणा दिल्लीतूनच होईल हे स्पष्ट झाले आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 17 जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसला नेता निवडावा लागेल. विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसवर नवा नेता निवडीची वेळ आली आहे.
नेतेपदासाठी विजय वडेट्टीवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वर्षा गायकवाड यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा आहे.



























































