
कोरोना विषाणू ससंर्ग रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते. या जनता कर्फ्युला रायगड जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व रस्ते हे निर्मनुष्य झाले असून वाहनांच्या व नागरिकांच्या वर्दळीपासून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. रस्त्यावर पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी पाहायला मिळत आहे.
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने गर्दीची ठिकाणे टाळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील गर्दीची सर्व ठिकाणे बंद करण्यात आलेली आहेत. आज रविवार 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. रस्त्यावर नागरिक न येता घरात बसून आहेत. रोज धावणारे रस्ते आज पूर्णतः निर्मनुष्य व वाहन विरहित पाहायला मिळत आहेत.
मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगतिमार्ग तसेच अंतर्गत रस्तेही आज थांबले आहेत. नागरिकांनी स्वतःहून या जनता कर्फ्युला प्रतिसाद दिला आहे. जनता कर्फ्युच्या निमित्ताने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन रायगडकराना केले होते. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुरू असून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहेत.




























































