
आलिशान होंडा सिटी कारमधून रेकी करत भरदिवसा बंद घरे फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या रायगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी या घरफोड्यांनी हलता मुक्काम करत रायगडसह सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक घरे फोडल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून त्यांच्याकडून पोलिसांनी १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर १५ लक्ष ५० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
रायगडमधील पाली, रोहा, महाड, श्रीवर्धन या परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या. या वाढत्या घरफोड्यांच्या घटनांना आळा घालण्याच्या सूचना रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाला व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि मानसिंग पाटील यांच्या दोन पथकांनी कसोशीने तपास करत टोळीचा म्होरक्या शाहनवाज कुरेशी (५०) याच्या उत्तर प्रदेशच्या सिकंदराबाद येथून बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी केली असता त्याने हिना कुरेशी, शमीम कुरेशी, नौशाद कुरेशी व एहसान या सहकाऱ्यांच्या मदतीने रायगड, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी शमीम व हिना कुरेशी यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील दोन फरार घरफोड्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली
बंटी बबलीला अटक
स्वस्त किराणा व घरगुती सामान पुरवण्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. नवीन पांचाळ (५२) व विद्या पांचाळ अशी त्यांची नावे असून ते दोघे पती पत्नी आहेत. या दोघांनी हेदुटणे व पाले बुद्रुक परिसरातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वस्त दरात मिळवून देतो, असे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ५ हजारांचा गंडा घातला होता. याबाबत तक्रार मिळताच तालुका पोलिसांनी पुण्याच्या आळंदीतून अटक केली. त्यांच्याविरोधात वाठोडे, नागपूर, कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.






























































