
आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबवता यावी यासठी रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या चेनचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीतच करा, हे प्रवाशांना नव्याने समजावून देण्याची वेळी रेल्वेवर आली आहे.
कारण, आपत्कालीन परिस्थितीऐवजी प्रवासी भलत्याच कारणासाठी चेन ओढू लागले आहेत. अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी कारणांसाठी करू लागले आहेत. अशा प्रकारे चुकीच्या कारणांसाठी चेन ओढल्यामुळे केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही तर त्या ट्रेनच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो.
मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने चालतात आणि त्यांच्या वेळापत्रकात अडथळे येतात. तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.
अशा गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग घटनांवर मध्य रेल्वेचं बारीक लक्ष आहे. यात एप्रिल ते जुलै 2022 या कालावधीत अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराची 1230 प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी सुमारे 1143 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 7.59 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांनी अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग करू नये. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन ओढणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे, असं आवाहन आणि इशारा रेल्वेने दिला आहे.




























































