रेल्वे तिकीट रद्द केल्यास सर्व रक्कम परत मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे आरक्षित केलेले तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास दंड म्हणून कोणतीही रक्कम न कापता तिकिटाची सर्व शंभर टक्के रक्कम संबंधिताला परत केली जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्याला रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळणे आवश्यक आहे. त्याची दखल घेत ज्या प्रवाशांनी 15 एप्रिलपर्यंतच्या प्रवासाचे आरक्षण केले आहे, पण आता गर्दी टाळण्यासाठी ते आपले आरक्षण रद्द करत असतील तर त्यांच्या खिशाला झळ बसून नये म्हणून रेल्वेने तिकिटाची सर्व रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने जर गाडी रद्द केली असेल तर संबंधित प्रवाशाने प्रवासाच्या दिवसापासून पुढील 45 दिवसांत कधीही कोणत्याही तिकिट खिडकीवर तिकीट दाखवल्यास त्याला तत्काळ पैसे परत केले जाणार आहेत. तर ज्या प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केले आहे त्यांना आपल्या प्रवासाच्या दिवसापासून पुढे 30 दिवसांत आपले तिकीट सादर करावे लागणार आहे.