
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाचा भाग कोसळण्याच्या अपघातास पश्चिम रेल्वेच्या इंजिनीयरिंग विभागाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बुधवारपासून या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत चौकशी सुरू झाली असून त्याचा अहवाल पंधरा दिवसांनी येणार आहे.
रेल्वे यंत्रणेत कोणत्याही रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामापासून ते देखभालीपर्यंतची सर्व जबाबदारी इंजिनीयरिंग विभागाची असते. या अधिकाऱयांकडून वर्षातून एकदा प्रत्येक पुलाची संपूर्णतः पाहणी होते. पूल बांधल्यानंतर एक स्वतंत्र फाइल तयार केलेली असते. त्यात प्रत्येक वर्षी तपासणीनंतर अधिकाऱयांकडून शेरे दिले जातात. त्यामुळे अंधेरीतील पुलाच्या सुरक्षा ऑडिटमध्ये नेमके काय शेरे देण्यात आले होते हे मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या चौकशीत स्पष्ट होणार आहे.
पूल बांधताना त्यातील सुरक्षा व देखभालीचे नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे असल्याचे पूलक्षेत्रातील तज्ञ आणि अजमेरचे माजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशिकांत लिमये यांनी म्हटले आहे.
कँटीलिवर पद्धतीचे पूल हटवणार
पश्चिम रेल्वेवरील अंधेरीतील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर अशा पद्धतीने बांधलेले कँटीलिवर धर्तीचे रेल्वेच्या हद्दीतील पूल कोणत्याही कारणांनी धोकादायक ठरत असल्यास ते पाडणेच योग्य असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी सुरक्षा ऑडिट करून लागलीच निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याप्रकारे मुंबईत सहा ते सात पूल असून त्यांचा लवकरच आढावा घेतला जाण्याचीही शक्यता आहे.
संयुक्त पाहणीनंतरच पुलाचे भविष्य ठरणार
पश्चिम रेल्वेच्या अंधेरीतील गोखले पुलाचे पालिका आणि रेल्वेचे अधिकारी संयुक्त पाहणी करणार असून त्यानंतर हा उड्डाणपूल वाहनांसाठी पुन्हा सुरू करायचा की याचा निर्णय होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले आहे. या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्र यांच्यामार्फत चौकशी करण्याची प्रक्रिया बुधवारी दुपारी सुरू करण्यात आली असून त्याचा अहवाल पंधरा दिवसात येणार आहे. दरम्यान, आयआयटी, मुंबईचे संचालक देवांग विपिन खक्कर यांच्यामार्फत उपनगरीय मार्गावरील सर्वच पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे.





























































