नगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्ह्यात आद्रा नक्षत्र जोरदार बरसत असून, गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून, काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शेवगाव तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली असून, शहरातील आंबेडकर चौक ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साठले होते. जोरदार पावसामुळे शेतकऱयांनी खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू केली असून, उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्यामुळे बळीराजा आनंदात आहे. नगर शहरात पावसामुळे काही ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून, आज दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, अकोले तालुक्यातील १९३ एमसीएफटी क्षमता असलेले आंबीत धरण ओव्हरफ्लो झाले असून, मुळा नदी वाहती झाली आहे. यामुळे पिंपळगाव खांड धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात सलग तिसऱया दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी आणि रविवारी नगर शहरात काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. जिह्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. कालच्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. त्यातच सीनेचे पात्र मोठे करण्याची कारवाई हाती घेण्यात आल्यानंतर बहुतांशी पाणी नदीपात्रातूनच जाताना दिसत होते. शहरामध्ये महानगरपालिकेने सुमारे २५६ घरे पावसाळ्याच्या आत पाडावीत, असे निर्देश दिले होते. मात्र, प्रशासनाने म्हणावी अशी कारवाई केली नाही. दोन ठिकाणी लहान भिंती पडल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अनेक ठिकाणी जुनी घरे असल्यामुळे पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांचे काही ठिकाणी पॅचिंग करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात अनेक ठिकाणचे पॅचिंग खराबही झाले. दुसरीकडे शहरात साचलेला कचरा पावसाच्या पाण्यात सर्वत्र वाहताना दिसत होता.

आंबीत धरण ओव्हरफ्लो 

संगमनेर अकोले तालुक्यातील आंबित धरण ओव्हरफ्लो झाले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता १९३ एमसीएफटी क्षमतेचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. मुळा नदी वाहती झाल्याने लवकरच पिंपळगाव खांड येथील धरणही भरणार आहे.

मागील वर्षी आंबित धरण १६ जून रोजी ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सात दिवस उशिराने हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या या धरणाचा ओव्हरफ्लो पाण्याचा विसर्ग ४०० क्युसेक्सने वाहत आहे. लवकरच मुळा धरणात पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यात नगर जिह्यात ओव्हरफ्लो झालेले आंबित हे पहिले धरण आहे.

राहुरीत सलग दोन दिवस पाऊस

राहुरी आद्रा नक्षत्रातील पावसाने शुक्रवारपाठोपाठ शनिवारी सायंकाळी तालुक्यातील बहुतांशी भागांत दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांच्या प्रतीक्षेत असलेला राहुरीचा शेतकरी सुखावला आहे. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात दमटपणा असल्याने पावसाच्या आगमनाचे अंदाज बांधण्यात आले होते. सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह पावसाचे जोरदार आगमन झाले. तासाभराच्या कालावधीनंतर पावसाचा जोर ओसरला. बाजारपेठांत पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचल्याने बाजारपेठांच्या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. शनिमंदिराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याने नेहमीप्रमाणे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

१ जूनला बिगरमोसमी पावसाने राहुरीला झोडपले होते, तर ८ जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्राने २० जूनपर्यंत राहुरीकडे पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. दरम्यान, २१ जून या मृग नक्षत्राच्या शेवटच्या रात्री पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. यापाठोपाठ आद्रा नक्षत्रातील २२ व २३ जूनला लागोपाठ दोन पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी सायंकाळी राहुरी तालुक्यातील बहुतांशी भागांत तासभर झालेल्या दमदार पावसाने खरीप हंगामातील पिकांच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. शनिवारी राहुरी १६ , मुळानगर २७ , वांबोरी ३७ , कोतुळ ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शेवगाव शहरात पावसाची उघडीप

शेवगाव शहरात शुक्रवारी दुपारी वरुणराजाचे आगमन झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस चालू होता. पावसामुळे शहरातील आंबेडकर चौक ते बसस्थानकाच्या चौकात असणाऱ्या रस्त्यावरून गुडघ्यापर्यंत पाणी वाहत होते. तालुक्यात बोधेगाव, बालमटाकळी, एरंडगाव, ढोरजळगाव व अमरापूर तसेच भातकुडगाव भागातील दहिगाव ने, शहरटाकळी या परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात आहे. शनिवारीही पावसाच्या सरी बरसल्या, तर रविवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्गाची बी-बियाण्यांच्या दुकानांवर गर्दी दिसून आली. दोन दिवसांनी वाफसा झाल्यानंतर कपाशी, तूर, बाजरी, मुगाची पेरणी सुरू होणार आहे. पावसामुळे तालुक्यातील ढोरजळगाव तसेच वरूर या ठिकाणचे बंधारे तुडूंब भरून वाहताना दिसत आहेत.