पश्चिम दुतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवा! आदित्य ठाकरे यांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम द्रुतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवावा तसेच हा महामार्ग हरित करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्या. राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल व पर्यटन, मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयास भेट दिली व  मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा  घेतला.

आदित्य  ठाकरे यांनी यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉइंट- कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त   आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त बी. जी. पवार उपस्थित होते.

ट्रफिक मॅनेजमेंट टनेल

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर ते माहीमपर्यंतचा सरफेस अपग्रेड व सुभोभिकरणाचे काम चालू आहे. ट्रफिक मॅनेजमेंट, टनेल, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे काम लवकरच सुरू होत आहे.

प्रकल्प वेळेत पूर्ण करा

कोस्टल रोड आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. वांद्रे-कुर्ला संकुल ते नंदादीप गार्डन, पश्चिम द्रुतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामाचीही त्यांनी यावेळी पाहणी केली.

मच्छीमारी नौकांना अडथळा नाही

नरिमन पॉइंट-कफ परेड कनेक्टर हा प्रकल्प मच्छीमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता व्यावसायिक व निवासी क्षेत्रातील वाहतूक सुलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाइन जूनपर्यंत तयार असेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.