मला मोदींच्या भाषणातले डावपेच कळतात, अशोक गेहलोत यांचा खोचक टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टोलेबाजी केली आहे. मी खूप काळापासून राजकारणात आहे आणि मला मोदींच्या भाषणातले डावपेच कळतात, असं गेहलोत म्हणाले आहेत. रविवारी जयपूर येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

गेहलोत म्हणाले की, नरेंद्र मोदी आपल्या भाषणाची सुरुवात करताना नेहमी माझे मित्र अशोक गेहलोत अशी सुरुवात करतात आणि नंतर माझ्याच सरकावर टीका करायला लागतात. हे डावपेच असतात. आणि हे डावपेच मला समजतात. मी सुद्धा बऱ्याच काळापासून राजकारणात आहे, असं गेहलोत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 एप्रिल रोजीच्या भाषणावर गेहलोत यांनी टोलेबाजी केली आहे. 12 एप्रिल रोजी जयपूर येथे वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते.

त्याच भाषणावर गेहलोत यांनी निशाणा साधला आहे. तसंच, राजस्थान सरकारच्या विविध योजना आणि अर्थसंकल्पाच्या घोषणांना देशभरात लागू करण्याची मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली. नरेंद्र मोदी हे अनुभवांची ज्येष्ठता मानतात, तर त्यांनी अनुभवज्येष्ठतेच्या हिशोबाने सल्ले घ्यावेत आणि आमच्या अनुभवाचा फायदा मिळवावा. आमच्या योजना देशभर लागू कराव्यात, असं गेहलोत यावेळी म्हणाले.