
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पायलट हे गद्दार आहेत. 2020 मध्ये स्वपक्षाचेच सरकार पाडण्यासाठी पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भाजपने पैसे दिले होते. पायलट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असा घणाघाती हल्ला गेहलोत यांनी केला आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. 2020 मध्ये मुख्यमंत्री गेहलोत यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री असलेले सचिन पायलट यांनी बंड केले होते. त्यावेळी पायलट काँग्रेस प्रदेशाध्यक्षही होते. काँग्रेस पक्षाने पायलट यांचे हे बंड मोडून काढले. पायलट यांना मंत्रीमंडळातून हटविले आणि प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले. पायलट यांनी पुन्हा दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये बंडाचा प्रयत्न केला पण तो हाणून पाडला गेला. काही दिवसांपूर्वी गुर्जर आरक्षण संघर्ष समितीच्या नेत्यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस विरोध केला आहे. पायलट यांना मुख्यमंत्री करा अन्यथा ही यात्रा राजस्थानात येऊ देणार नाही असे समितीने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पायलट यांच्यावर गंभीर आरोप करीत हल्लाबोल केला.
10 कोटी दिल्याचे पुरावे आहेत
2020 मध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली होती. त्यांची दिल्लीत बैठक झाली होती असे गेहलोत म्हणाले. या बंडामागे गृहमंत्री शहा होते.
पायलट यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना 5 कोटी तर काहींना 10 कोटी रूपये मिळाले. हे पैसे दिल्लीतील भाजप कार्यालयातून देण्यात आले होते. याचे पुरावे आपल्याकडे आहेत. पायलट यांच्याबरोबर बंडखोरी केलेल्या आमदारांना धर्मेंद्र प्रधान भेटले पण काँग्रेस नेत्यांना भेटू दिले नाही, असा आरोप गेहलोत यांनी केला.
त्यांच्या पाठीशी 10 सुद्धा आमदार नाहीत
सचिन पायलट हे गद्दार आहेत. गद्दार कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाही. हायकमांडसुद्धा पायलट यांना मुख्यमंत्री करणार नाही.
पायलट यांच्या पाठीमागे दहासुद्धा आमदार नाहीत. प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी 2020 मध्ये आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. देशात पहिल्यांदाच असे घडले. त्यांनी बंडखोरी केली, पक्षाला धोका दिला. ते गद्दार आहेत असे गेहलोत यांनी सांगितले.




























































