आरोपीने पोलिसाचा जीव घेतला! मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याचे धिंडवडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नागपूर

अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा आरोपीने जीव घेतल्याची संतापजनक घटना रविवारी मध्यरात्री यवतमाळमध्ये घडली. आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलिसही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याचे पार धिंडवडेच निघाले आहेत.

यवतमाळ जिह्यात मारेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हिवरी येथे ही घटना घडली. या घटनेत पोलीस हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे (48) हे मृत्यू पावले. पोलीस चालकासह पाच पोलिसांचे पथक काल रात्री 1 वा. आरोपी अनिल लेवू मेश्राम (35) याच्या घरी त्याला पकडण्यासाठी गेले. पोलिसांनी आरोपीला आवाज देऊन घराबाहेर येण्यास सांगितले तेव्हा ‘मी येणार नाही… जा… तुम्ही माझे काय करता ते मी पाहून घेतो. मला हात लावून तर दाखवा’ असे गुर्मीत अनिल मेश्रामने पोलिसांना सुनावले. यानंतर अचानक त्याने आणि त्याच्या आईने पोलिसांवर लाकडी दांडक्याने तुफानी हल्ला चढवला. यात हवालदार राजेंद्र कुळमेथे यांच्या डोळय़ाला, हाताला, तोंडाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस हवालदार मधुकर मुळे, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे हे गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी प्रतिहल्ला करून दोघा मायलेकांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले. यामुळे घाबरून गेलेल्या पोलिसांनी मोठमोठय़ाने आवाज देत गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

गावकऱ्यांनी हवालदार राजेंद्र कुळमेथे यांच्यासह सर्वांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे हवालदार कुळमेथे यांना तपासाअंती मृत घोषित केले . दरम्यान, पोलिसांनी आरोपीला शोधण्याचे काम सुरू केले आहे.

नागपुरातही पोलिसावर गुंडांचा चाकूहल्ला

नागपूरमध्ये जरीपटका भागात एका पोलिसावर आज दोन गुंडांनी चाकूने वार केले. आकाश पेट्रोलपंपावर पोलीस पद्माकर उके हे रांगेत उभे असताना त्यांचा दोघांशी वाद झाला. नंतर त्यांनी दोन साथीदारांना बोलावले. यानंतर  पद्माकर उके यांच्या डाव्या हातावर लाकूड कापण्याच्या आरीने वार करून हे तरुण फरार झाले.