
>> राजेश पोवळे
‘रडू नको रे चिमण्या बाळा, हसण्यासाठी जन्म आपुला’ या गाण्याच्या ओळीची बाळगुटी घेऊन आपण जन्माला येतो, पण जसे मोठे होत जातो, तसे आयुष्याच्या रहाटगाडग्यात इतके अडकतो, फसतो, इतके वेगवेगळे अनुभव घेतो की, दिवसाच्या शेवटी ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो?’ असा प्रश्न स्वतला विचारण्याची वेळ येते. चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, पण चेहऱ्याचं खरं सौंदर्य दडलेलं असतं ते एका मनमोकळ्या दिलखुलास हास्यात. कायम हसतमुख असलेला माणूस प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. प्रसन्न हास्य हे माणसाचं सगळ्यात मोठं वैभव आहे. कोणत्याही मानसिक तणावावरचा रामबाण उपाय म्हणजे हसणं. चेहऱ्यावर लागलेलं आनंदाचं तोरण म्हणजे हसणं. कठीण परिस्थितीशी दोन हात करण्याचं पहिलं अस्त्र म्हणजे हसणं. व्यक्तिमत्त्व विकासाचा पहिला पाठ म्हणजे हसणं. जग जिंकण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे हसणं आणि माणसांना आपलंसं करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न म्हणजे हसणं.
आज जागतिक हास्य दिवस. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हास्य दिन साजरा केला जातो. 1998 साली डॉक्टर मदन कटारिया यांच्या संकल्पनेतून हास्य दिन साजरा करण्याची सुरूवात झाली. आपल्या आजूबाजूला असलेल्या द्वेष आणि तिरस्काराच्या वातावरणात सकारात्मकतेचं बीज पेरण्यासाठी हास्य दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली गेली. याच विचाराची कास धरून आज प्रत्येक शहरात छोटे छोटे हास्य क्लब स्थापन झालेत.
केवळ मानसिक नाही, तर वेगवेगळ्या शारीरिक व्याधींवरही हसणं हा एक प्रथमोपचार असतो. हसण्यामुळे शरीरातील एंडोर्फिस हा घटक कार्यान्वित होतो, ज्यामुळे आपल्याला कुठे वेदना होत असेल तर ती कमी होते. एंडोर्फिस हा रासायनिक घटक पेनकिलरप्रमाणे काम करतो. हसण्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो, ज्यामुळे ते स्नायू बळकट होतात आणि चेहरा प्रफुल्लित दिसतो. टेन्शनपासून बचाव करणारं संरक्षक कवच म्हणजे हास्य. याच हास्याचं उगमस्थान म्हणजे विनोद.
जो माणूस उत्तम विनोद निर्मिती करतो, ज्याच्याकडे अफलातून सेन्स ऑफ ह्युमर आहे अशा व्यक्तीभोवती कायम माणसांचा गराडा असतो, त्या माणसाचा सहवास अनेकांना हवाहवासा वाटतो. निकोप आणि निर्भेळ विनोद हे ज्यांचं बलस्थान होतं, ते पु. ल. देशपांडे म्हणूनच तर आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. स्वतची दुःखं गिळून दुसऱ्यांना हसवणाऱ्या चार्ली
चॅप्लिनला आजही अनेकांनी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात जपून ठेवलं आहे.
तोच चार्ली चॅप्लिन असं म्हणतो की, ज्या दिवशी तुम्ही एकदाही हसत नाही, तुमच्या आयुष्यातला तो दिवस वाया गेला असं समजा. त्यामुळे आजपासून घरातून बाहेर पडताना जेव्हा जेव्हा आरशात बघाल तेव्हा तेव्हा एका प्रसन्न हास्याची चंद्रकोर आपल्या चेहऱ्यावर लावायला विसरू नका.





























































