निष्ठावंतांना डावलून भाजपची उमेदवारी भागवत कराड यांना, खडसेंच्या पदरी पुन्हा निराशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार जाहीर करताना भाजपने पुन्हा एकदा निष्ठावंतांचा गेम केला आहे. संभाजीनगरचे माजी महापौर भागवत कराड यांचे नाव जाहीर करून भाजपने एकनाथ खडसे यांच्या नावावर परत फुल्ली मारली आहे. दरम्यान, शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांची तर काँग्रेसने राजीव सातव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. चतुर्वेदी आणि सातव उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. महाविकास आघाडीची चौथी जागा कोणाच्या पारडय़ात जाणार याबाबत मात्र अजूनही स्पष्टता झालेली नाही.

राज्यसभेच्या सात जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार तर भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतील. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपने रिपाइंचे रामदास आठवले व उदयनराजे भोसले यांची नावे आधीच जाहीर केली होती. या दोघांनीही गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे तिसरे उमेदवार म्हणून आज संभाजीनगरचे माजी महापौर भागवत कराड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ते शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ज्योतिरादित्य यांच्या बंडानंतर…

आघाडीच्या चार जागा निवडून येऊ शकतात. यातील दोन जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसही दुसऱया जागेसाठी आग्रही आहे. याबाबत अजून निर्णय झालेला नाही. दरम्यान, काँग्रेसने आज राजीव सातव यांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, रजनी पाटील अशी मातब्बर मंडळी या एकमेव जागेसाठी प्रयत्नशील होती, परंतु काँग्रेसने राजीव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी या दोघांचीही मर्जी असलेल्या सातव यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली होती. त्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडामुळे पक्षातील तरुणांना संधी देण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली दिसत आहे.

चर्चेत होतो, पण उत्सुक नव्हतो!

राज्यसभेच्या तिसऱया जागेसाठी माजी मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत होते, मात्र भागवत कराड यांची उमेदवारी जाहीर करून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आपले नाव चर्चेत होते, पण त्यांनी केंद्राच्या राजकारणात जाण्यासाठी फारसे उत्सुक नव्हतो असा दावा केला. मात्र विधानसभेत उमेदवारी नाकारलेल्या खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळेल का याबाबत प्रश्नचिन्हच आहे.