
बिहारमध्ये दारूकांडात अनेकांचे बळी गेलेले असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेत विरोधकांनाच उद्देशून दारुडे हा शब्दप्रयोग वापरल्याने राज्यसभेत आज त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. विशेषतः चीनच्या घुसखोरीवरून लक्ष इतरत्र वळविण्यासाठी दारूकांडाचा मुद्दा आज भाजपच्या कामाला आला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले. चीनच्या घुसखोरीच्या मुद्दय़ावरूनही दोन्ही सभागृहांत विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच बिहारमधील दारूकांडावरून भाजपा खासदारांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा टप्प्याटप्प्याने तहकूब करावे लागले. चीनच्या घुसखोरीचा विषय अडगळीत टाकण्यासाठी भाजपने बिहारच्या दारूकांडाचा विषय लावून धरला. दरम्यान, चीनच्या घुसखोरीबाबत सरकारने सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी राज्यसभेत विरोधकांनी दोन वेळा सभात्याग केला.
लोकसभेतही विरोधकांनी चीनच्या घुसखोरीबाबत सरकारने विस्तृत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. मात्र, सरकार पक्षाने ती फेटाळली. महागाईविरोधात सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत तसेच पेंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी हे उद्धटपणे उत्तर देत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आज लोकसभेतही सभात्याग केला.


























































