
सामना प्रतिनिधी । नगर
शहरामध्ये भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही रविवारी झालेल्या जाहीर सभेमध्ये आम्ही सर्व बरोबर आहोत असे वक्तव्य खुद्द पालमंत्री राम शिंदे यांनी केले. भाषणातच आम्ही सर्व बरोबर आहोत असे ठामपणे सांगितले खरे, मात्र हे जाहीर सभेत जाहीर करण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपामध्ये गटातटाचे राजकारण नवीन नाही, पालकमंत्री राम शिंदे, शहराध्यक्ष दिलीप गांधी व प्रदेश सदस्य अभय आगरकर व जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड असे चार जणांचे चार गट हे वेगवगळ्या माध्यमातून नेहमीच भाजपातर्गंत आहेत.
निवडणूक जाहीर होण्यापुर्वीच एकमेकांचे पाय ओढण्याचे काम या गटांनी केले आहे. गांधी- आगरकरांचे मनोमिलन होत नव्हते. त्यामुळे कार्यकर्तेसुध्दा सैरभर झालेले दिसत होते. पक्षाकडे म्हणावे असे दिग्गज आलेले नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्याच वेळेला गांधी आगरकर गटाची चर्चा पुन्हा शहरात भाजपातर्गत चांगलीच रंगली होती. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अनेक कार्यक्रमाला ना पालकमंत्री गेले ना आभय आगरकर गेले ना भानुदास बेरड गेले. तर काही कार्यक्रमांना प्रदेशाने सांगितल्यावर त्यांना जाण्याची तसदी घ्यावी लागली. मात्र, कोणाच्या प्रवेशाला जायचे की नाही जायचे हे सुध्दा आपआपल्या पातळीवर ठरवण्यात आले.
भाजपच्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर पक्षांतर्गत नाराजी उफाळून येवू नये म्हणून पालकमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणातच आम्ही सगळे एकच आहोत आम्ही सर्व बरोबर राहतो, काहींना उगाचच आम्ही वेगळे असल्याचे जाणवते याची आठवण करुन देऊन आम्ही सर्वजन एकत्र आहोत असे सांगितले, हाच धागा पकडत शहराध्यक्ष गांधी यांनी मंचावर आम्ही सर्व एकत्र आहोत आम्ही सर्व बरोबर आहोत, तसेच एकमताने निर्णय घेतो असे सांगितले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासमोर गटातटाचे राजकारण नको, असा सावध पवित्रा, सर्वांनीच घेतला मात्र जाहीर सभेत आम्ही एकच आहोत ही सांगण्याची वेळ का आली, कशी आली, या बाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे.
































































