
मराठमोळे ज्येष्ठ विषाणूशास्त्र्ाज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह महाराष्ट्रातील पाच जणांचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ तर उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये एका शानदार कार्यक्रमात वर्ष 2020 मधील हा पहिल्या टप्प्यातील पुरस्कार वितरण समारोह आयोजित करण्यात आला होता.
वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रांतील 7 मान्यवरांना पद्मविभूषण, 16 मान्यवरांना पद्म भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील डॉ. रमण गंगाखेडकर यांच्यासह अभिनेत्री सरिता जोशी व कंगना राणावत, गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. गंगाखेडकर हे वरिष्ठ विषाणूशास्त्र्ाज्ञ आहेत. त्यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल ऍण्ड रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या साथीचे आजार आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. सरिता जोशी यांनी गेल्या 7 दशकांत दूरचित्रवाणी, नाटक आणि सिनेजगतात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. सिनेक्षेत्रातील गायनासाठी अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.



























































