
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
योगगुरू आणि पतंजली समूहाचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांनी मतदान अधिकारांसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. ज्यांना दोनपेक्षा अधिक मुले आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात यावा. तसेच अशा व्यक्तींना निवडणुकीसाठी उमेदावारी देखील देण्यात येऊ नये अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
पंतजली परिधान शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बाबा रामदेव यांनी या महत्वाच्या मुद्यावर भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे. तसेच देशाला आर्थिकदृष्ट्या ही स्वातंत्र्य मिळवण्याचे आपले उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात लोकसंख्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुणी दोन पेक्षा अधिक बालकांना जन्म देत असतील तर त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून रोखले पाहिजे. त्यांनातर शाळा आणि हॉस्पिटल सारख्या सोयी मोफत देणे ही थांबवले पाहिजे, असेही ते म्हणाले.




























































