रामलिलेदरम्यान खरोखरच राजा दशरथाने प्राण त्यागले, नाटक समजून लोकं टाळ्या वाजवू लागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभू श्रीराम वनवासाला जातात आणि पूत्रवियोगाने दशरथ राजाचा मृत्यू होतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये रामायण साकारताना खरोखरच दशरथ राजाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बिजनोर जिल्ह्यातील हसनपूर गावात दसऱ्यानिमित्त रामलिलेचे आयोजन करण्यात आले होते. रामलिलेमध्ये दशरथ राजाची भूमिका राजेंद्र सिंह नावाचा कलाकार साकारत होता. प्रभू श्रीराम वनवासाला निघाल्याचा प्रसंग आल्यानंतर राजा दशरथ भावूक होतात. राजा दशरथाची भूमिका करणारे राजेंद्र सिंह स्टेजवर कोसळतात. प्रेक्षकांना ते नाटक करत असल्याचे वाटले, त्यामुळे ते टाळ्या वाजवू लागले.

रामलिलेचा प्रयोग झाल्यानंतर पडदा लावला जातो, तरीही राजा दशरथाची भूमिका करणारे राजेंद्र सिंह उठत नाहीत. सहकलाकार राजेंद्र सिंह यांना उठवण्यासाठी येतात, मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्याचे लक्षात येतात त्यांची धावपळ सुरू होते. सहकलाकार त्यांना रुग्णालयात दाखल करतात, मात्र उपचारापूर्वीत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, हसनपूरमध्ये 2 ऑक्टोबरपासून रामलिलेचे आयोजन करण्यात आले होते. 14 ऑक्टोबर रोजी प्रभू श्रीराम वनवासाला जातात हे दृश्य दाखवले जाणार होते. याच दरम्यान अभियन करता-करता राजा दशरथाची भूमिका करणाऱ्या राजेंद्र सिंह यांचे निधन होते. ते गेल्या 20 वर्षापासून रामलिलेमध्ये दशरथ राजाची भूमिका साकारत होते, अशी माहिती त्यांच्या सहकलाकारांनी दिली.