राणा कपूर यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळपास 600 कोटींच्या कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी दुसऱ्यांदा केलेला जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. राणा कपूर हे मागील तीन वर्षांपासून कोठडीत असले तरी त्यांच्याविरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. यात सार्वजनिक पैशांची अफरातफर झाल्याचे दिसून येते. या प्रकरणात पुराव्यांमध्ये फेरफार केला जाण्याची भीती आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी नोंदवले. याच न्यायमूर्तींनी याआधी फेब्रुवारी 2021 मध्ये राणा कपूर यांचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता. राणा कपूर यांनी स्वतःसाठी तसेच कुटुंबातील इतर सदस्य व सहकाऱयांना अवाजवी आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यांचा लाचखोरी, भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीच्या गुह्यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात गुह्याची रक्कम 5333 कोटी रुपयांची आहे. राणा कपूर यांनी कुटुंबाच्या मालकीच्या तसेच इतर कंपन्यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात गुह्याची रक्कम देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. हा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे, असे न्यायमूर्ती नाईक यांनी आदेशात म्हटले आहे.