
सामना ऑनलाईन। रांची
चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अखेर अन्नपाणी घ्यायला सुरुवात केली आहे. 23 मे रोजी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे ते व्यथीत झाले होते. त्यांनी अन्नपाणी पूर्णपणे सोडून दिले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. आता डॉक्टरांनी समजूत काढल्यामुळे त्यांनी पुन्हा दोनवेळचे जेवण घ्यायला सुरुवात केली आहे.
त्यांनी दुपारचे जेवण सोडून दिले होते. प्रकृती अस्वास्थामुळे सध्या ते रिम्स रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. रिम्सचे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी याबाबत अधिक माहिती दिली. 24 आणि 25 मे रोजी लालू यांनी दुपारचे जेवण घेणे बंद केले होते. परंतु, औषधे घेण्यासाठी जेवण घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लालूंची प्रकृती ढासळली होती. तसेच त्यांना झोपही लागत नसल्यांची त्यांची तक्रार होती. सध्या ते व्यवस्थित जेवण घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.





























































