आजपासून रणजी करंडकाची अंतिम झुंज, तीन वर्षांत दुसरे जेतेपद जिंकण्यासाठी सौराष्ट्र सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी करंडकाच्या इतिहासात सर्वाधिक 12 वेळा उपविजेता ठरलेला बंगालचा संघ आपला 33 वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी उद्यापासून ऐतिहासिक ईडन गार्डनवर सौराष्ट्रविरुद्ध भिडणार आहे. बंगालने 15 व्यांदा अंतिम फेरी गाठलीय, तर सौराष्ट्र तीन वर्षांत दुसरे जेतेपद काबीज करण्यासाठी सज्ज झालाय. ईडन गार्डनवर बंगालचे पारडे जड असल्यामुळे बंगाल 2019-20 साली सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या अंतिम फेरीचा वचपा काढण्यासाठी आसुसलेला आहे.

बंगालची ताकद त्यांच्या फलंदाजीत आहे, हे आता अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेट विश्वाला कळलेय. अनुस्तुप मजुमदार, संदीप कुमार घरामी, अभिमन्यू ईश्वरनच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय तर आकाश दीप, इशान पोरेल, शाहबाज अहमदच्या गोलंदाजीची धारही बंगालला लाभलीय. त्यामुळे सौराष्ट्रपेक्षा वर्तमान बंगालचा संघ सरस आहे. त्यातच त्यांनी बाद फेरीत मिळविलेले विजयही मोठे आहेत. पण सौराष्ट्रलाही कमी लेखून चालणार नाही. बाद फेरीत त्यांची काहीशी गडबड झाली असली तरी अर्पित वसावडाने कमाल फलंदाजी केलीय. सौराष्ट्रच्या कामगिरीत सातत्य नसले तरी त्यांनी झुंजार खेळ केलाय, हे मात्र खरे आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी पाचव्यांदा अंतिम फेरी गाठलीय. ही एक भन्नाट कामगिरी आहे. सौराष्ट्रने आपल्या कारकीर्दीतील पहिले जेतेपद तीन वर्षांपूर्वी बंगालला हरवून मिळविले होते. ते जेतेपद पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर पटकावले होते. मात्र आता सामना निकाली लागणार. इतका वेगवान खेळ सध्या खेळला जातोय.

 बंगालचे भाग्य फळफळणार

1989-90 साली बंगालने तब्बल 50 वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर रणजी करंडकाचे जेतेपद पटकावले होते. त्याआधी त्यांच्या संघाने 1938-39 साली दक्षिण पंजाबला हरवून आपले पहिले जेतेपद संपादले होते. मात्र तिसऱया करंडकासाठी गेले 33 वर्षे बंगाल झगडतोय. 1989-90 नंतर त्यांनी चक्क चारवेळा अंतिम फेरी गाठली, पण चारही वेळेला अंतिम सामना कोलकात्यात झाला नाही आणि चारही वेळेला त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी अंतिम सामना कोलकात्यात आहे. बंगाल फॉर्मात आहे, त्यांचे खेळाडू सुपर फॉर्मात आहे. त्यामुळे बंगाल इतिहास बदलण्यासाठी, दुष्काळ मिटविण्यासाठी पूर्ण तयारीनिशी तयार आहे.

संभाव्य संघ

बंगाल ः अभिमन्यू ईश्वरन, सुमंता गुप्ता, सुदीपकुमार घरामी, अनुस्तुप मजुमदार, मनोज तिवारी (कर्णधार), शाहबाज अहमद, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), आकाश घातक, आकाश दीप, मुकेश कुमार, इशान पोरेल.

सौराष्ट्र ः हार्विक देसाई, स्नेल पटेल, विश्वराज जडेजा/जय गोहिल, शेल्डन जॅक्सन, अर्पित वसावडा, चिराग जानी, प्रेरक मंकड, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, युवराजसिंह दोडिया.