
विविध मागण्यांची प्रशासन दखल घेत नसल्याने राहुल अशोक कुंभार (रा.हनिमनाळ ता.गडहिंग्लज) या तरुणाने आज रंकाळा तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच रंकाळा तलावाजवळ पोलिस आणि अग्निशमन दलाचा पहारा होता. मात्र तो तरुण दिवसभरात फिरकलाच नाही. त्यामुळे या दोन्ही पथकाना दिवसभर ताटकळत राहावे लागले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,राहुल कुंभार याने प्रशासनाकडे केलेल्या विविध मागण्यांची दखल घेतली गेली नसल्याने त्याने ऐतिहासिक रंकाळा तलावात आज जलसमाधी घेणार असल्याचा इशारा पोलीस व कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास लेखी पत्राद्वारे दिला होता. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळ पासून रंकाळा परिसरात कडक पहारा ठेवला होता.पण सायंकाळी उशिरापर्यंत कुंभार याठिकाणी फिरकलाच नाही.त्यामुळे पोलीस व अग्निशमन दलाला दिवसभर ताटकळत उभे रहावे लागले.
नुकतीच इंचलकरंजी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आत्मदहनाने खळबळ उडाली असल्याने,पोलिस व अग्नीशमन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती.




























































