
सामना प्रतिनिधी । बीड
एक हजार मुलांमध्ये एकाद्या बाळाला होतो, असा पायलोरीक स्टेनोसिस आजार एक महिन्याच्या बाळाला झाल्याने त्याच्या नाकातोंडातून उलट्या, पचन न होणे अशी लक्षणे सुरू झाली. बीड सारख्या ठिकाणी उपचार होत नसल्याने बाहेर जिल्ह्यात उपचारासाठी जाणे ही खर्चीक बाब न परवडणारी असल्याने बाळाच्या कुटुंबिया समोर मोठे संकट उभे होते. अशा अडचणीत एक महिन्याच्या बाळाला ‘काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले, सर्व तपासण्या झाल्यानंतर बाळावर येथील तज्ञ डॉक्टरांनी अत्यंत किचकट अशी शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. सद्या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. यापूर्वी ज्या शस्त्रक्रिया संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे होत होत्या अशा किचकट शस्त्रक्रिया व सर्व आजारांवर ‘काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल’ व ‘मोतीरामजी कार्डियाक युनिट’ येथे एकच छताखाली अल्पदरात निदान होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.
चिंचवन ता. वडवणी येथील परी शाहदेव म्हात्रे या एक महिन्याच्या बाळाला गंभीर आजार झाला. सतत उलट्या, पचन न होणे, बाळाची वाढ होत नाही, अशी लक्षणे दिसून आली. काकू – नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ञ डॉ सचिन आंधळकर यांनी त्यावर निदान करत सर्जरी हा त्यावरील एकमेव पर्याय असल्याचे सुचवले. एक महिन्याचे बाळ असल्याने अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया. त्यातच बीड सारख्या ठिकाणी सुविधा नसल्याने अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेकरीता संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे जावे लागत होते. मात्र ‘काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉ. प्रदीप राठोड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली तर भूलतज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे, रोहन शिनगारे व इतरांनी सहकार्य केले. बाळाची संपूर्ण देखरेख बालरोगतज्ञ डॉ. सचिन आंधळकर यांच्या निगराणी खाली करण्यात आली असून सद्या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. विशेष म्हणजे स्व. मोतीरामजी वरपे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने व दुष्काळ परिस्थितीमुळे अल्प दरात उपचार करण्यात येत आहेत. सर्व आरोग्याच्या सुविधा अल्प दरात देत असतात यापुढे एक दिवसाच्याही बाळावरही किचकट शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचा दावा येथील तज्ञ डॉक्टरांनी केला आहे.





























































