
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे पुण्यतिथी महोत्सवात गर्दी होणार नाही याची दक्षता अखिल भारतीय सेवामंडळाने घेतली आहे.
अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाला विदर्भातून लाखो भाविक एकत्र येतात. या निमित्ताने सामुदायिक प्रार्थना, ध्यान, चिंतन असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांच्या सोयीसाठी दैनंदिन कार्यक्रमांचे ऑनलाईन आणि स्थानिक वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्याहस्ते महाराजांच्या समाधीवर तिर्थस्थापना, चरणपादुका पूजन व अभिषेकाचे पूजन करण्यात आले. यावेळी मोजक्या भाविकांची उपस्थिती होती. कोरोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने योग्य ती दक्षता घेतली आहे. यंदाचा पुण्यतिथी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.
































































