
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
रत्नागिरी शहरात नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. पाइपलाईनवरील चाव्या बंद करून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.
शीळ धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही रत्नागिरी शहरात पाणी पुरवठा योग्यरित्या होत नाही. पाणी वितरणातील निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. काही भागात पाणी येते तर काही भागात पाणी नाही अशी अवस्था आहे. शहरातील चर्चरोड परिसरांत बाजूच्या दोन इमारतींना मुबलक पाणी पुरवठा होतो तर मध्यभागी असलेल्या घराला पाण्याचा थेंब मिळत नाही.
चाव्यांचा खेळ
पाणीपुरवठ्याची यंत्रणा चाव्यांवर अवलंबून आहे. हितसंबध जपण्यासाठी ठराविक परिसरात पाणी भरपूर जावे म्हणून चाव्या बंद केल्या जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.काही कनेक्शन तर चावीच्या वरून घेतली आहेत त्यांच्या पाणीपुरवठ्यावर कोणाचेही नियंत्रण नाही अशी अवस्था आहे.


































































